Sairat


सैराट या चित्रपटाची सुरुवात फक्त आवाजाने होते आणि शेवट फक्त दृश्याने होतो. मधल्या ३ तासाच्या प्रवासात जे काही आपण पाहतो ते नुसत पाहण नसून एक आनंद देणार, झिंग आणणार आणि शेवटी विषण्ण करणार अनुभवण आहे.

तस पाहायला गेल तर कथानकात काहीच नाविन्य नाहि. अनेक वेळेला वापरून गुळगुळीत झालेला फार्मुला, तोच तो गरीब नायक, श्रीमंत नायिका, नायिकेचा खडूस बाप आणि प्रेमातले अडथळे. नाविन्य आहे ते पटकथेत आणि दृष्यात्मक मांडणीत. दिग्दर्शक आपल्याला प्रेमाच्या हिन्दोळ्यावरुन सहज पणे वास्तवाच्या पातळीवर आणुन वास्तवाची चांगलीच जाणिव करून देतो.

प्रशांत हा एका खालच्या जातीतला मुलगा त्यांचाच गावातल्या उच्च वर्गीय श्रीमंत पाटलाची मुलगी अर्चनाच्या प्रेमात असतो. अर्चना उर्फ आर्ची एक स्वच्छंद मनमोकळी आणि बिंधास अशी मुलगी स्वताहुन पुढाकार घेवून प्रशांतला उर्फ परश्याला प्रेमाची कबुली देते. एका नाजूक क्षणी आर्ची चे वडील परश्या आणि आर्ची ला पकडतात आणि तिथून सुरु होतो प्रेमातल्या अड्थळ्याचा प्रवास. दोघांच घर सोडून पळून जाण त्यांना पळायला परश्याचे मित्र आणि आर्ची च्या मावस भावाने केलेली मदत, दुसर्या शहरात जाउन दोघांच स्वताच्या पायावर उभ राहाण या सगळ्या काळात परश्याच्या कुटुंबाची होणारी कुचंबणा, त्यांना गाव सोडायला लागण, आर्चिच्या राजकारणी वडिलांचा अहंकार दुखावला जाण अश्या अनेक गोष्टी घडतात. चित्रपटाच्या शेवटी जे होत ते प्रत्यक्ष चित्रपटगृहातच जाउन पहायला हव.

प्रेक्षकांना बेसावध क्षणी पकडण हा बहुदा नागराज यांचा स्वभाव असावा. फ्याण्ड्रि या पहिल्या चित्रपटाच्या अखेरीस अनपेक्षित पाने जब्या ने कॅमेरा च्या दिशेने फेकलेला दगड हा कॅमेरावर फेकलेला नसून समाजाच्या तोंडावर फेकलेला होता. सैराट चा शेवट मात्र त्याहीपेक्षा जास्त सुन्न, अंतर्मुख आणि अतिशय अस्वस्थ करणारा असा अनुभव देतो. नागराजने सैराट चा शेवट ज्या पद्धतीने चित्रित केलाय त्या बद्दल लिहायला शब्द कमी पडतिल.

पटकथा लेखक म्हणून नागराज फक्त प्रेम, गाणी, दोस्ती यारी यावरच न थांबता सामाजिक, राजकीय, वैयक्तिक आणि पुरुषी अहंकार अश्या अनेक बाजूना स्पर्श करतो. नागराज कडे असलिली प्रगल्भ राजकीय तसेच सामाजिक जाणीव आणि त्या अनुषंगाने चित्रपटात येणार्या दृष्यांचा इथे उल्लेख होण आवश्यक आहे.

एक स्त्री आमदार निवडून आल्या नंतर पाटील यांचा आधीच दुखावला गेलेला अहंकार अजूनच डिवचला जाण, प्रेम केलेलं असून सुद्धा आर्चीच्या चारित्र्यावर परश्याच संशय घेऊन तिला मारहाण करण, पंचायतीने परश्याच्या कुटुंबाला वाळीत टाकण, परश्याच्या वडिलांना जात पंचायती समोर मुलाच्या चुकांची माफी मागायला लागण, प्रिन्स या पाटलाच्या मुलाच भर वर्गात शिक्षकाच्या मुस्काटीत मारण, खालच्या जातीतल्या शिक्षकाच परश्याला सांगण कि पाटलाच्या पोरी बरोबर झोपलास ना मग दे सोडून तिला आता, परश्याचा मित्र प्रदीप उर्फ लंगड्याच अपयशी प्रेमप्रकरण आणि त्याला स्वताची कमकुवत असलेल्या बाजूची होणारी जाणीव, परश्या आणि त्याच्या मित्रा मधली दोस्ती अशी अनेक दृष्य नागराज अतिशय प्रभावी पणे मांडतो.

अजून एका गोष्टीचा उल्लेख इथे मुद्दामून करावा वाटतो तो म्हणजे नागराजने बऱ्याचदा रूपकात्मक metaphorical दृष्यांचां वापर केला आहे. परश्या आणि आर्ची मधली सामाजिक दरी हि अनेक दृष्यामधून मोजके संवाद वापरुन चित्रित केली आहे. एका गाण्याच्या सुरवातीला परश्या आर्चीला एका अश्या झाडावर बसवतो ज्यावर एकही पान नसत. आर्ची त्याला म्हणते अजून वरच्या फांदीवर जा त्यावर परश्याच मी अजून वर गेलो तर फांदी तुटेल हे सांगण बरच काही बोलून जात.

तांत्रिक दृष्ट्या हा चित्रपट अपेक्षेवर खरा उतरतो. लोकेशन्स ची केलेली निवड, कॅमेराचा अतिशय प्रभावी वापर, डोळ्यांना सुखावणार छायांकन, अजय अतुल यांच संगीत या सगळ्या जमेच्या बाजु. सर्वच गाण्याचं चित्रिकरण एकदम झकास. खास करून झिंगाट हे गाण. महत्वाची गोष्ट म्हणजे झिंगाट या गाण्याला नृत्य दिग्दर्शक नाहि. संकलनाचा विचार करता संपूर्ण चित्रपटात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवती ती म्हणजे नागराजने बरीच दृष्य रेंगाळत ठेवली आहेत. हे करून सुद्धा ३ तासांचा चित्रपट जर सुद्धा रटाळ वाटत नाही हे त्याच आणि संकलकाच यशच मानावं लागेल.

अभिनया बद्दल बोलाव तर सगळ्याच अभिनेत्यांनी त्यांच्या भूमिकांना न्याय दिलाय. आकाश ने परश्या चांगला साकारला आहे. त्याचे दोन्ही मित्र भाव खाउन जातात. उल्लेखनीय अभिनय म्हणजे रिंकू राजगुरुचा. आर्ची म्हणून रिंकू छा गायी है. कॉलेज मधली मुलगी ते आईचा प्रवास रिंकूने अतिशय ताकदीने उभा केलाय. पाटलाची पोर म्हणून असणारी थोडीशी व्रात्य, बिंधास, बुलेट चालवणारी, पुरुषांना न्यूनगंड देणारी आणि प्रसंगी बंदुक चालवणारी आर्ची अशा अनेक अभिनयाच्या छटा तिने समर्थ पणे निभावल्यात. खास करून घर सोडून गेल्यावर अचानक भेडसावणार्या दाहक समस्यांना सामोरे जाताना तिची होणारी मानसिक दमछाक यात तिच्या अभिनयाच नाण खणखणीत वाजत.

असा हा सैराट त्यामुळे या चित्रपटाचा अनुभव चित्रपटगृहात घ्यायलाच हवा.

reply